आपण आपल्याभोवती सर्वत्र हिरवीगार झाडी पाहातो. ही हिरवळ येते कुठून? झाडे आणि वनस्पती यांच्यामुळे जगामध्ये ही हिरवळ येते. त्यांची पाने जगाला हा हिरवा रंग देतात.
यांपैकी अनेक झाडे व वनस्पती आपल्याला परिचित आहेत. आपण त्यांना सहज ओळखतो. पण पाने नसली तर त्यांना ओळखणे कठीण बनते. प्रत्येक झाडाच्या किंवा वनस्पतीच्या पानांची स्वतःची विशेषता असते.
पण वेगवेगळी झाडे व वनस्पती यांच्या पानांमध्ये काही सारखेपणही असते का? आपण पानांबद्दल अधिक माहिती करून घेऊया. यासाठी आपण क्षेत्र भेटीवर जाऊया.
क्षेत्र भेट (field trip) म्हणजे वर्गाच्या बाहेर जावून बाहेरच्या वस्तूचे निरीक्षण करणे आणि त्यांचा अभ्यास करणे. किडे, प्राणी, झाडे व वनस्पती, दगड, खडक आणि माती यांचा अभ्यास करण्यासाठी आपण अनेक क्षेत्र भेटी देणार आहोत.
आजची क्षेत्र भेट ही झाडे व वनस्पती यांच्या पानांचा अभ्यास करण्यासाठी आहे.

क्षेत्र भेटीची तयारी

या क्षेत्र भेटीसाठी चार-चार जणांच्या गटात आपल्या शिक्षकांसोबत जा. क्षेत्र भेटीला जाण्यापूर्वी प्रत्येक गटाने खालील गोष्टी गोळा करायला हव्यात.
(अ) ब्लेडचे पाते, वही, पेन्सिल
(ब)  पाने ओळखण्यासाठी पानांचा तक्ता. (हा तक्ता तुमच्या सहित्य संचात आहे.)
तुम्हाला जी झाडे व वनस्पती दिसतील त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. जवळपास जर एखादे शेत किंवा बाग असेल तर तिथेही जा. हा अभ्यास करताना झाडे, वनस्पती आणि शेतात उभी असलेली पिके यांचे नुकसान होणार नाही, नासधूस होणार नाही याची काळजी घ्या.

पानांची मांडणी
या क्षेत्र भेटीत पानांच्या मांडणीचे देखील निरीक्षण करा. पाने खोडांवर वा फांद्यांवर फुटतात. वनस्पतींच्या खोडांवर वा फांद्यांवर फुटलेल्या पानांची मांडणी कशी आहे ते आपण पाहू. एखाद्या विशिष्ट वनस्पतीमध्ये ही पाने फुटण्याचा एखादा विशिष्ट क्रम वा संरचना असते का, की पाने कोणत्याही क्रम वा संरचनेशिवाय वाढतात तेही आपण पाहू.
फांद्यावर पानांची तीन प्रकारची मांडणी असते.

काही वनस्पतींच्या फांदीवर एकेकच पान फुटलेले असते. म्हणजे फांदीवर एके ठिकाणी एकच पान फुटते. अशी मांडणी असलेल्या पानांना एकांतरित पाने (single leaf) म्हणतात.
काही वनस्पतींमध्ये फांद्यांवर पाने जोडीने फुटतात. या प्रकारच्या मांडणीला जोड पाने (leaf pair) म्हणतात. सर्व जोड पाने जर एकाच दिशेने फुटत असतील तर त्यांना संमुख पाने म्हणतात, व बदलत्या दिशेने फुटत असतील तर आवर्ती पाने म्हणतात.
काही वनस्पतींच्या फांद्यांना एकच ठिकाणी तीन किंवा जास्त पानांचे घोस फुटतात. अशा मांडणीला वर्तुळाकार पाने (leaf whorl) म्हणतात.
या पानांच्या मांडण्या तक्ता क्र. 1 मध्ये दाखवल्या आहेत. हाच तक्ता साहित्य संचामध्ये देखील आहे. हा तक्ता घेऊनच तुम्हाला क्षेत्र भेटीला जायचे आहे. पानांच्या प्रत्येक मांडणीसाठी कमीत कमी पांच वनस्पती शोधा, त्या वनस्पतींची नावे माहीत करून घ्या व ती तक्ता क्र. 1 मध्ये लिहा.

हा पूर्ण भरलेला तक्ता तुमच्या वहीत चिकटवा. (1)
एकांतरित पाने असलेल्या वनस्पतींमध्ये ती एकेक पाने फांदीवर कशी फुटलेली आहेत ते पाहा. सर्व पाने फांदीच्या एकाच बाजूला आहेत की वेगवेगळ्या ठिकाणी आहेत? जर तुम्हाला फांदीवर एकाच बाजूला पाने असलेली वनस्पती दिसली तर ती सर्व वर्गाला दाखवा.   

पाने गोळा करा
पानांची जास्त खोलात जाऊन ओळख करून घ्यायची असेल तर तुम्हाला काही पाने शाळेत परत घेऊन जायची गरज आहे. प्रत्येक गटाने गोळा केलेली वेगवेगळी पाने शाळेत आणा. कोणत्याही एका वनस्पतीची एक किंवा दोन पानेच खुडायची आहेत. पाने खुडताक्षणी ती ओल्या हातरुमालात किंवा टॉवेलात ठेवा. अन्यथा एखाद्या मासिकाच्या  किंवा वर्तमानपत्रांच्या पानांच्या मध्ये पान सरळ करून ठेवा आणि वरून हाताने  दाब द्या. असे केल्याने पानांचा आकार न बदलता कायम राहील.
तोडताना पाने देठापासून तोडा
ज्या झाडाचे पान तोडले असेल त्या वनस्पतीचे नाव ताबडतोब लिहा. त्या वनस्पतीच्या पानांची मांडणी कशी होती तेही लिहा. कदचित काही वनस्पतींची नावे तुम्हाला माहीत नसतील. मित्राला किंवा कोणालातरी विचारून ते नाव लिहा. त्या वनस्पतीचे नाव कोणालाच माहीत नसेल तर त्या वनस्पतीला तुम्हीच एक नवीन नाव द्या किंवा त्या पानाला एक नंबर द्या.
काटे असलेल्या वनस्पतीची पाने तोडून घेताना ब्लेडचे पाते वापरून काळजीपूर्वक काढून घ्या.
या पुढचा अभ्यास आता शाळेत जाऊन करूया.   

शाळेत पोचल्यावर
तुम्ही तोडलेली व गोळा केलेली पाने तुमच्या गटाच्या समोर मांडून ठेवा. आता आपण त्यांचा अभ्यास करू. त्या पानांचा अभ्यास करायचा म्हणजे त्यांचे एकेक पैलू तपासायचे.
तुमच्या वहीत तक्ता क्र. 2 उतरवून घ्या. पानाचे नीट निरीक्षण करा आणि तक्ता क्र. 2 मध्ये दाखवलेल्या एखाद्या वैशिष्ट्याशी त्या पानाचे वैशिष्ट्य जुळते का ते पाहा.

तक्त्यातील जुळणाऱ्या वैशिष्ट्यामोर त्या पानाच्या वनस्पतीचे नाव लिहा. (2)

तक्ता क्र. 2

क्र. पानाचे वैशिष्ट्ये वनस्पतीचे नाव
1 देठ असलेले  
2 देठ नसलेले  
3 करवती बाजू असलेली  पाने  
4 टोकदार पान  

तक्त्यामध्ये पानांच्या सर्व वैशिष्ट्यांचे वर्णन दिलेले नाही. वनस्पतींच्या पानांची आणखी अनेक वैशिष्ट्ये तुम्हाला आढळतील. उदाहरणार्थ त्रिकोणी पाने किंवा दोन भागात विभागलेले टोक असलेली पाने.
पानांची निरनिराळी वैशिष्ट्ये समजण्यासाठी पानांचे निरनिराळ्या पद्धतीने निरीक्षण करा. त्यांचा पृष्ठभाग तपासा.  त्यांचे टोक कसे आहे ते पाहा. त्यांचा रंग पाहा. पानांची जास्तीत जास्त प्रकारची वैशिष्ट्ये पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जी नवी वैशिष्ट्ये सापडतील त्यांची तक्त्यामध्ये नोंद करा आणि ज्या वनस्पतींच्या पानांत ती वैशिष्ट्ये आढळली त्या वनस्पतींची नावे देखील तक्त्यात त्यासमोर लिहा. तुमच्या वर्गातील इतर गटातील मुलांना काही वेगळी वैशिष्ट्ये असलेली पाने मिळाली असतील तर त्या वैशिष्ट्यांची व पानाची देखील तुमच्या तक्त्यात नोंद करा.
पानांची काही वैशिष्ट्ये तुम्ही चित्राच्या रूपात देखील दाखवू शकता. उदाहरणार्थ दंतेरी कडा असलेली पाने, टोकदार टोक असलेली पाने बाजूच्या चित्रात दाखवली आहेत.

पानांची दोन वैशिष्ट्ये निवडा. तुम्ही निवडलेल्या वैशिष्ट्यांची चित्रे काढण्याचा प्रयत्न करा. (3)

पानांचे आणखी एक वैशिष्ट्य

आपण पानांची अनेक वैशिष्ट्ये पाहिली.. आता आपण त्यांच्या आणखी एका वैशिष्ट्याचा अभ्यास करूया.  तुम्हाला तुमच्या पानांच्या पृष्ठभागावर शिरा दिसतील.  जर तुम्हाला शिरा नसलेले पान मिळाले असेल तर ते पान सर्व वर्गाला दाखवा.
शिरा स्पष्ट दिसण्यासाठी पान उजेडासमोर धरून त्याचे निरीक्षण करा.
वेगवेगळ्या पानांमधले हे शिरांचे जाळे कसे आहे ते पाहा.

त्या शिरांच्या जाळ्यात तुम्हाला काही फरक दिसला का? (4)

या शिरांच्या संरचनेला शिराविन्यास (venation) असे म्हणतात.

चित्र क्र. 1 मधील पानात तुम्हाला पानाच्या मध्यभागी असलेली एक जाड शीर दिसत आहे. तिला मुख्य शीर (mid rib) म्हणतात. या मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला तुम्हाला शिरांचे जाळे दिसते. या प्रकारच्या संरचनेला जाळीदार शिराविन्यास (reticulate venation)  म्हणतात. अशी संरचना असलेल्या पानाला ______ पान  म्हणतात.
चित्र क्र. 2 व 3 मधील पानांच्या चित्रात सर्व शिरा या एकमेकाला समांत्तर आहेत. अशा शिरांच्या संरचनेला समांत्तर किंवा पट्ट्यांचा शिराविन्यास (parallel venation) असे म्हणतात.

तक्ता क्र. 3

शिरांची रचना /शिराविन्यास

वनस्पतीचे नाव

जाळीदार किंवा चाळणी सारखा शिराविन्यास

 

पट्टेदार किंवा समांत्तर शिराविन्यास

 

तक्ता क्र. 3 तुमच्या वहीत उतरवून घ्या. .तुम्ही गोळा केलेल्या पानांचे वर्गीकरण करा व जाळीदार व पट्टेदार शिराविन्यास असलेली पाने असणार्‍या वनस्पतींची नावे तक्त्यात नोंदवा.
विविध प्रकारच्या पानांची तुम्हाला आता ओळख झाली आहे. तुमची पानांची ही ओळख किती पक्की आहे ते पाहण्यासाठी आपण एक खेळ खेळूया.

पानांबरोबर लपाछपी
या खेळात पाने तुम्हाला फक्त स्पर्शाने  वा वासाने ओळखायची आहेत. हा खेळ दोन गटात खेळायचा आहे. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही गटांनी सर्व पाने पाहून घ्यायची आहेत. पाने पाहून झाल्यावर एका गटाच्या डोळ्यावर पट्टी बांधा. दुसर्‍या गटाने या डोळे बांधलेल्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक पान ठेवायचे आहे. फक्त हाताचा स्पर्श करून किंवा वास घेऊन त्यांना हे पान ओळखायचे आहे.
डोळे बांधलेल्या गटाने सर्व पाने ओळखल्यानंतर दुसर्‍या गटाने डोळे बांधून आता ती पाने ओळखायची आहेत.
या खेळासाठी पाने नीट काळजीपूर्वक निवडायला हवीत. निवडलेली पाने स्पर्शाने व वासाने ओळखता येतील अशी हवीत. जवळ जवळ एकसारखी असणारी पाने ओळखायला दिलीत तर दुसर्‍या गटाला ती ओळखणे कठीण जाऊ शकते. असे झाले तर खेळाची मजा येणार नाही.

पानांचे प्रदर्शन भरवा
पानांचा अभ्यास केल्यानंतर ती पाने वर्तमानपत्राच्या पानांमध्ये किंवा मासिकाच्या पानांमध्ये ठेवा व दाबा. पानाच्या वनस्पतीचे नाव कागदावर लिहून प्रत्येक पानाच्या देठावर चिकटवा. नाव लिहिताना पेन्सिलने लिहा कारण शाईने नाव लिहिले तर पाण्याने किंवा आर्द्रतेने शाई पसरल्यामुळे नंतर कदाचित नाव वाचता येणार नाही. पाने ठेवलेल्या वर्तमानपत्राची किंवा मासिकांची चळत रचा व त्यावर वजन ठेवा. जमले तर हे वजन ठेवण्यापूर्वी पसरलेल्या वर्तमानपत्रांवर किंवा मासिकावर एक मोठा पुठ्ठा किंवा लाकडी फळी ठेवा. असे केल्याने वर ठेवलेल्या वजनाचा दाब सर्व पानांवर  सारखाच पडेल. पाने दर दोन किंवा तीन दिवसांनी बाहेर काढून वर्तमानपत्राच्या दुसर्‍या पानांमध्ये ठेऊन चळत वजनासकट परत रचा. पाने संपूर्ण सुकेपर्यंत वर्तमानपत्राची पाने बदलत राहा.

प्रदर्शन तयार करणे
सुकलेल्या पानांचे प्रदर्शन आता तयार करावयाचे आहे. एक मोठा कार्डबोर्डचा पुठ्ठा घ्या. त्या पुठ्ठ्यावर पाने शिवा किंवा चिकटवा. प्रत्येक पानाच्या खाली त्या पानाच्या वनस्पतीचे नाव लिहा. हे प्रदर्शन जास्त आकर्षक बनवण्यासाठी पानांचे (वैशिष्ट्यांनुसार) गट करून गटवार मांडणी करा. पुठ्ठ्यावर डाव्या बाजूच्या समासामध्ये त्या गटाचे नाव लिहा व त्या गटाच्या नावासमोर त्या गटातील पाने चिकटवा.

घरी हे करा: पानांपासून चित्रे बनवा
पानांची रचना करून तुम्ही सुंदर चित्रे बनवू शकता. मध्य प्रदेशमधील एक कलाकार विष्णू चिंचाळकर (गुरुजी) यांनी पाने, फुले यांचा वापर करून अनेक मनमोहक व रोचक चित्रे चितारली आहेत. त्यांच्या मते कला ही आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत असते.

नवीन रोपे उगवू शकणारी पाने
आपण पाहिले की पानामध्ये अनेक वैशिष्ट्ये असतात. आता असाधारण वैशिष्ट्य असलेल्या एका पानाबद्दलचा खालील उतारा वाचा. उतारा वाचून झाल्यावर असेच एखादे वेगळे असाधारण वैशिष्ट्य असणारे एखादे पान तुम्हाला माहीत आहे का त्याचा विचार करा.
पानफुटी (Bryophyllum pinnatum) ही अशीच एक असाधारण वनस्पती आहे. तुम्ही ती पाहिली असेल. या वनस्पतीची पाने मांसल असतात व तिच्या पानांच्या कडेला खाचा असतात. या पानांबद्दलची एक रोचक गोष्ट ही आहे की या पानांना जमिनीचा  स्पर्श झाला तर त्या पानांच्या खाचांमधून नवीन रोपे फुटतात. बर्‍याचदा नवीन रोपे या खाचेतून उगवते व नवीन झाड वाढते.
अशा प्रकारची अनेक असाधारण वैशिष्ट्ये असलेली पाने आहेत. तुम्ही त्यांचा शोध घेतलात तर तुम्हाला अशी आगळीवेगळी पाने नक्की सापडतील.
अरेच्चा!  पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली नाही! .एका वनस्पतीला कितीतरी पाने असतात. ही एवढी सारी पाने करतात तरी काय? प्रत्येक पानाला शिरा असतात. या शिरा काय काम करतात? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण पुढच्या इयत्तेत घेऊ.

उजळणीसाठी प्रश्न
1. दोन वेगवेगळ्या वनस्पतींची पाने घ्या. त्यांच्यातील पाच समान वैशिष्ट्ये व पाच भिन्न वैशिष्ट्ये शोधा. .
2. खालील चित्रात तुम्हाला विविध आकाराची पाने दाखवली आहेत. ही चित्रे आपल्या वहीत काढा व प्रत्येक आकाराच्या पानाच्या खाली पानांचा तसा आकार असलेल्या तीन वनस्पतींची नावे लिहा.
3. काही वनस्पतींची नावे खाली दिलेली  आहेत. तुम्ही त्यातील बर्‍याचशा वनस्पती पाहिल्या असतील. त्यांची पाने पाहा. आधी कधी लक्षात आले नसेल तर आता नीट पाहा व त्यांचे शिराविन्यास जाळीदार आहेत का पट्टेदार आहेत ते सांगा.  
    पालक, कोथिंबीर, गवत, मेथी, मुळा, पुदीना, आंबा, पिंपळ, तुळस, कोबी, ऊस
4. खाली काही वैशिष्ट्यांची यादी दिली आहे. प्रत्येक वैशिष्ट्यासमोर ते वैशिष्ट्य जुळाणारी पाने असणार्‍या वनस्पतीचे नाव लिहा.
            गुळगुळीत पृष्ठभाग असलेली पाने
            केसाळ पाने
            लाटांसारख्या कडा असलेली पाने
            काटे असलेली पाने,
            वास असलेली पाने
            ठिपके असलेली पाने
            मांसल पाने

पाने झोपतात का?
काही झाडांची पाने सूर्यास्तानंतर मिटताना तुम्ही पाहिले आहे का? म्हणजे समोरासमोरील पाने एकमेकांवर येऊन मिटतात. अशी पाने असणार्‍या पाच वनस्पती शोधा. अशा प्रकारे मिटल्याने पाने झोपी गेली आहेत असे वाटते!

नवीन शब्द:-

क्षेत्र भेट                  प्रदर्शन             प्रजाती
एकांतरित पाने         जोड पाने          वर्तुळाकार पाने
मुख्य शीर              शिराविन्यास       जाळीदार शिराविन्यास
पाणीदार               पट्ट्यांचा शिराविन्यास